‘पुढारी’ वर्तमानपत्राच्या ०१ जानेवारीच्या (२०२४ ) वर्धापनदिन विशेषांकाच्या ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ या विशेष पुरवणीत  प्रसिद्ध झालेला माझा लेख 

वर्क-लाइफ बॅलन्स: ‘जीविका’ आणि ‘उपजीविका’ सांभाळताना

प्रा. डॉ. शिरीष शितोळे, सहयोगी प्राध्यापक (मानसशास्त्र),

महावीर महाविद्यालय, कोल्हापूर, ई–मेल: shirishbright@gmail.com

            जीवनशैलीतून उद्भवणाऱ्या आजारांचे वाढते प्रमाण, नात्यांमधील उसवत जाणारी वीण, व्यसनांचा सामान्य वर्तन म्हणून होणारा स्वीकार, ‘आपण कसे सुखी आहोत’ हे अहमहमिकेने दाखवणारे समाज माध्यमावरील देखावे आदी बाबी पाहिल्या की ‘करिअर’ म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात आर्थिक यश मिळवणे ही समाजमान्य धारणा किती तोकडी आहे, हे ठळकपणे दिसून येते. वास्तविक ‘करिअर’ या शब्दाचा अर्थ ‘जीवनमार्ग’ असा आहे. समाधानी आणि आरोग्यदायी जीवनासाठी अर्थ (पैसा) हवाच, मात्र तो कमावला की बाकीच्या गोष्टी आपोआप येतील आणि जीवन अर्थपूर्ण होईल असा समज करून घेणे खूप घातक आहे. पैशाबरोबरच शारीरिक, भावनिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य हेही तितकेच मोलाचे असते. त्या दृष्टीने जितक्या लवकर ‘वर्क-लाइफ’ समतोलाचा विचार आपण अंमलात आणू तितके हितकारक होईल.

            अनेकदा प्रेमाच्या भरात, कुणाच्या प्रेरणादायी शब्दांनी, इतरांच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी, स्वतःची ताकद दाखवून देण्यासाठी, आपणच कर्ते आणि तारणहार आहोत या भूमिकेने किंवा पद-प्रतिष्ठा-कौतुक-प्रसिद्धी यातील झिंग अनुभवण्यासाठी आपण काही आव्हाने स्वीकारतो. न पेलणारे संघर्ष निमूटपणे करत राहतो. भावनिक, मानसिक कोंडमारा सहन करत राहतो. यातून पैसे मिळवतानाच जीवनशैली मात्र हळूहळू बिघडत जाते. मग कधीतरी आणीबाणीची परिस्थिती येते, धक्के बसतात आणि आपण भानावर येतो. हे मोठी किंमत देऊन आलेले भान गेलेली वेळ परत आणू शकत नाही.

            वर्क–लाइफ समतोल साधायचा असेल तर प्रथमपासूनच ‘जीविका’ आणि ‘उपजीविका’ असे जीवनाचे दोन ठळक भाग करायला हवेत. उपजीविकेसाठी जे क्षेत्र आपण निवडतो त्यामध्ये बाजारपेठ, स्पर्धा, धोरणे, टारगेट्स, कामाच्या वेळा, सहकारी, वरिष्ठ-कनिष्ठ यांच्यातील संबंध, हेवेदावे, कुरघोड्या आदी साऱ्यांचे व्यवस्थापन करावे लागते. बदलते ज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यावे लागते. कालानुरूप त्यात भर टाकावी लागते. यातून आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. मात्र, बऱ्याचदा गोंधळ उडतो तो सुख-सुविधा आणि चैन यांची नेमकी व्याख्या करता न आल्याने. अनेक कुटुंबात चैनीलाच सुविधा मानून खर्च केला जातो आणि कालांतराने हीच चैन आपली गरज कधी बनली हेही लक्षात येत नाही! वर्क-लाइफ समतोल विस्कळीत होतो तो इथे. तो पुन्हा प्रस्थपित करावयाचा असेल तर गरजा कोणत्या, सुविधा कोणत्या आणि चैन कोणती यांची वास्तव आणि कठोर चिकित्सा कुटुंबात घडवून आणायला हवी. आपली उत्पादकता वाढावी, मन प्रसन्न राहावे, पुरेसा विरंगुळा-मनोरंजन व्हावे, सामाजिक जीवनातील आनंद लुटता यावा आणि प्रगतीसाठी पुढची वाट सुकर व्हावी या हेतूने आपण जी काही रक्कम गुंतवतो वा वापरतो ती ‘सुविधा’ आहे. मात्र, त्यापेक्षा जास्तीचा केलेला खर्च ही एकूण जीवनाचे आरोग्य विस्कळीत करू शकणारी ‘चैन’ आहे हे स्वीकारायला हवे. ‘आमची स्पर्धा आमच्या क्षेत्रातील कंपन्यांशी नसून झोमॅटोशी आहे कारण लोक पाचशे रुपयांची ऑर्डर तिथे सहज नोंदवतात पण पाचशे रुपयांची गुंतवणूक करण्यास खूप टाळाटाळ करतात’, हे म्युअचल फंड क्षेत्रातील जागतिक कंपनीच्या अध्यक्षाने नुकतेच नोंदवलेले निरीक्षण यादृष्टीने फारच बोलके आहे. तरुणाईतील ही उधळपट्टी उतारवयातील समस्यांचा पाया ठरू नये हे पाहणे आर्थिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. उपजीविकेचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी व्यक्तीच्या क्षमता आणि मर्यादा यांचे वास्तव भान ठेवायला हवे. त्यातून आपण कुटुंबातील सदस्यांना किती कष्ट करायला लावायचे हे पुरेसे उमगले की मागण्यांची यादी तारतम्याने मांडून कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुकर करता येणे नक्की शक्य आहे.

            उपजीविकेबरोबरच माणसाला ‘आपल्या अस्तित्वाचा नेमका अर्थ काय’ ‘आपला सर्वोच्च आनंद कशात आहे’, ‘मला आतून काय करावेसे वाटते’ ‘स्पर्धेच्या, समाजात सिद्ध करण्याच्या पलीकडे जाऊन कोणत्या गोष्टी केल्याने मला आत्यंतिक समाधान मिळते’ असे अनेक मूलभूत प्रश्न पडत असतात. हे ‘जीविके’शी संबंधित प्रश्न आहेत. उपजीविका बाहेरच्या जगाचा मानदंड आहे तर जीविका ही आतल्या जगाचा हुंकार आहे. जीविकेशी संबंधित कृती ही पैसा-प्रसिद्धी-वलय याने कधीच तोलू नये तर तिचा संबंध हा निर्भेळ आनंद आणि समाधानाशी आहे! वर्क-लाइफ मधील संतुलन साधण्यासाठी नक्की करता येणारी ही गोष्ट मात्र जागतिकीकरण, चंगळवाद, अहंकार सुखावणाऱ्या स्पर्धेचे आकर्षण यामुळे मागे पडते आहे. त्यामुळे जगाशी जोडले जात असतानाच स्वतःपासून आपण तुटत चाललो आहोत का, यासाठीचे आत्मपरीक्षण गरजेचे आहे. एकांतात अनुभवलेली शांतता, कोणाचीही भीडभाड न बाळगता करून पहावीशी वाटलेली गोष्ट प्रत्यक्षात करणे, लहान मूल होणे, जे आत वाटते आहे ते खुलून व्यक्त करणे, इतरांना त्यांच्या चुका आणि मर्यादेसहित स्वीकारणे, कृतज्ञता व्यक्त करणे, बिनशर्त माफी मागणे अशा गोष्टी आपण नजीकच्या काळात किती वेळा केल्या आहेत, हे ताडून पाहिले की आपली जीवनशैली आरोग्यदायी आहे की नाही याचा अंदाज येतो. आपल्याला कधीकाळी आवडलेले वा शिकावेसे वाटलेले बासरी, व्हायोलिन, तबला किंवा तत्सम वाद्य आपण वाजवतो का? चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य अशा कलांना आपण जोपासले आहे का? फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, कॅलिग्राफी यासारख्या छंदांसाठी आपण वेळ काढला आहे का? वाचन, नाटक, अभिनय, गाणे, कविता यात आपण रमतोय का?, पोहणे, ट्रेकिंग, मैदानी खेळ आपण खेळतो का? जिव्हाळ्याच्या नातेवाईक, मित्रांबरोबर ठरवून प्रत्यक्ष देहाने गळाभेटी आणि दिलखुलास संवाद आपण नियमितपणे करतो का? काहीही झाले तरी दिवसातील ठराविक वेळ ध्यान, योगा, प्रार्थना, मन:शांतीसाठीचा एकांत यासाठी स्वतःला आपण उपलब्ध करून देतो का? ह्यातील कोणत्याच गोष्टीचा आर्थिक खर्च फारसा नाही मात्र त्या अनमोल आहेत! या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक यायला लागणे हे वर्क–लाइफ संतुलनाचा राजमार्ग गवसण्यासारखे आहे. मात्र, त्यासाठी समाजमाध्यमापासून ‘डेटोक्स’ करता येऊन त्यावरील अवलंबित्व कमी करण्याचे मूलभूत कौशल्य आत्मसात करायला हवे हेही तितकेच खरे.

 

 

Comments

Popular posts from this blog